Join us  

Dadasaheb Phalke, Chhagan Bhujbal: दादासाहेब फाळके यांचा वसा आपण जपायला हवा- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:55 PM

महाराष्ट्रात मल्टीप्लेक्स थिएटर्स मी स्वत: आणले, असेही भुजबळ म्हणाले.

Dadasaheb Phalke, Chhagan Bhujbal: नाशिकच्या दादासाहेब फाळके यांनी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वदूर चित्रपट बनू लागले. हा त्यांचा वसा आपण नक्कीच जोपासला पाहिजे, असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. "मनोरंजनाची माध्यमे आता बदलली आहेत. आता मोबाईलवर आणि टिव्हीवर देखील चित्रपट येऊ लागले आहेत. ही आव्हाने पेलत चित्रपटगृह मालकांनी या स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे. लोकांना गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा त्यांना देऊ केल्या पाहिजेत. दादासाहेब फाळकेंनी चित्रपट सृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळे देशभरात सर्वदूर चित्रपट बनण्यास सुरुवात झाली. दादासाहेब फाळके यांचा हा वसा नव्या पिढीने नक्कीच जोपासला हवा", असे भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्रात मल्टीप्लेक्स मी स्वत: आणले!

छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये एका मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले. त्यावेळी ते म्हणाले की, पूर्वीचा येवला आणि आत्ताचा येवला यात मोठा फरक आहे. या शहराचा आपण विविधांगी विकास केल्याने या ठिकाणी नवनवीन वास्तू , आणि उद्योग येत असल्याचा आनंद होत आहे. सगळ्या महाराष्ट्रात दिसणारे मल्टिप्लेक्स हे महाराष्ट्रात मी स्वतः घेऊन आलो. पर्यटन मंत्री असताना गुजरातमध्ये असे मल्टिप्लेक्स सुरू झाले होते. मात्र महाराष्ट्रात तसे मल्टीप्लेक्स नव्हते. त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही एक योजना आखून महाराष्ट्रात मल्टिप्लेक्स घेऊन आलो. सुरुवातीच्या अनेक मल्टिप्लेक्स चित्रपट गृहाचे उदघाटन आम्ही केले होते, असेही त्यांनी नमूद केले.

सर्व सोयी सुविधायुक्त असलेले अद्यावत चित्रपटगृह येवला नगरीत झाल्याने येवल्याच्या विकासात मोठी भर पडली असे म्हणावे लागेल. मनोरंजनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले चित्रपटगृह आज येवल्यात होत आहे यामुळे येवल्याच्या विकासात भरच पडेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :छगन भुजबळसिनेमा