अशाप्रकारे बनवला होता दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 6:13 AM
दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीला पहिला चित्रपट दिला. त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये १२१ चित्रपट बनवले आणि त्यातील २६ हे ...
दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीला पहिला चित्रपट दिला. त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये १२१ चित्रपट बनवले आणि त्यातील २६ हे लघुपट होते. धोंडिराज गोविंद फाळके असे त्यांचे नाव असून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक फोटोग्राफर म्हणून केली होती. पण त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी ते काम सोडून पुरात्व खात्यात नोकरी केली. त्याचदरम्यान त्यांनी प्रिटिंग प्रेसच्या व्यवसायाला देखील सुरुवात केली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान शिकायला ते जर्मनीला गेले. काहीतरी नवीन करायचे ही जिद्द नेहमीच त्यांच्या मनात होती. द लाइफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट त्यांच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. या चित्रपटानंतर त्यांनी देखील चित्रपट बनवण्याचे ठरवले आणि पहिला मूक चित्रपट बनवला. १९१३ मध्ये त्यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाच्या इतिहासाला सुरुवात झाली. या चित्रपटासाठी त्यांनी कशाप्रकारे कलाकारांची निवड केली हे देखील खूपच रंजक आहे. या चित्रपटातील तारामती या व्यक्तिरेखेसाठी ते अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यासाठी ते मुलीला शोधण्यासाठी कुंटण खान्यात गेले होते. पण चित्रपटासाठी मिळणारे मानधन हे खूप कमी असल्याचे सांगत तिथल्या अनेक मुलींनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ते तिथून बाहेर पडले आणि एका हॉटेलमध्ये चहा पित होते. त्यावेळी त्यांची नजर एका मुलीवर पडली आणि अशाप्रकारे त्यांना त्यांची तारामती मिळाली. याच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती नुकतीच दादरच्या दादासाहेब फाळके चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी तसेच चित्रपटसृष्टीचे अनेक मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.दादासाहेब फाळके यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ज्योती निसळ लिखित ‘ध्येयस्थ श्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्ताने प्रकाशित झालेले हे पुस्तक त्यांना अनोखी मानवंदना ठरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी यावेळी केले.ज्येष्ठ अभिनेते राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, आदेश बांदेकर, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, निर्माता दिग्दर्शक सतीश रणदिवे, पितांबर काळे, विनय नेवाळकर, विजय खोचीकर, शरद चव्हाण, संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.Also Read : पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर