यंदाच्या लग्न मौसमात धम्माल उडवून देणार 'दादला बुलेटवाला...' , पाहा त्याची झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 12:05 PM2020-12-24T12:05:55+5:302020-12-24T12:06:18+5:30
'दादला बुलेटवाला...' हे गाणं बऱ्याच वैशिष्ट्यांमुळं लाँच होताच चर्चेत आलं आहे. या गाण्याचं खास आकर्षण आहे सुशांत पुजारी. सुशांत पुजारी हे नाव एव्हाना सर्वांच्याच चांगलं परिचयाचं झालं आहे.
सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. लग्न म्हटले तर संगीताच्या तालावर ठेका धरण्यासाठी जबरदस्त गाणे तर हवेच. यंदाच्या लग्न मौसमात धम्माल उडवून देण्यासाठी मराठमोळं गाणं 'दादला बुलेटवाला' रसिकांच्या भेटीला आले आहे. मराठी सिने आणि संगीतसृष्टीनं नेहमीच जागतिक पातळीवर अलौकिक कामगिरी करीत जगभरातील संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य मराठीचा झेंडा फडवकत ठेवला आहे.
यात मराठमोळ्या ठेक्यांवर ताल धरायला लावणाऱ्या चित्रपटगीतांपासून अल्बम आणि सिंगल्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांमधील डान्सरला मनमुराद नृत्य करायला लावणाऱ्या सर्वच गीतांचा मोलाचा वाटा आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत 'दादला बुलेटवाला...' हे धमाकेदार मराठी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. कोरोनाची गडद छाया धूसर होत असताना ऐन लग्नाच्या हंगामात आलेलं 'दादला बुलेटवाला...' हे सिंगल अबालवृद्धांना ठेका धरायला लावणारं आहे.
'दादला बुलेटवाला...' हे गाणं बऱ्याच वैशिष्ट्यांमुळं लाँच होताच चर्चेत आलं आहे. या गाण्याचं खास आकर्षण आहे सुशांत पुजारी. सुशांत पुजारी हे नाव एव्हाना सर्वांच्याच चांगलं परिचयाचं झालं आहे. दिग्दर्शक-कोरिओग्राफर रेमो डिसूझांच्या 'एबीसीडी', 'एबीसीडी २', 'स्ट्रीट डान्सर' या हिंदी सिनेमांमध्ये सिनेरसिकांनी सुशांतच्या डान्सची जादू पाहिली आहे.
आता 'दादला बुलेटवाला...' बनून प्रथमच तो मराठीत आपला जलवा दाखवत आहे. सुशांतचा हा पहिलाच अल्बम मराठी भाषेत असणं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या गाण्यात सुशांतच्या जोडीला अमृता फडकेचं नृत्य आणि सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे.
'दादला बुलेटवाला' 'चं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी करणारे अमित बाईंग १९९६ पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून, मागील १० वर्षांपासून कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. 'साहेब बीवी और गँगस्टर', 'जब तुम कहो', 'जाने क्यों दे यारों' या हिंदी सिनेमांसोबतच अमित यांनी 'कॅनव्हास', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा', 'लालबागची राणी', 'चीटर', 'सिनीयर सिटीझन', 'व्हॅाट्सअप लव्ह', 'मिस यू मिस' या मराठी आणि 'कॅनव्हास', 'धंत्या ओपन', 'मि. कलाकार', 'दीवान हाऊस' या गुजराती सिनेमांसाठी कोरिग्राफी केली आहे. यासोबतच मराठी 'बिग बॅास'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनचं शीर्षकगीतही त्यांनी केलं आहे.
'अग्गंबाई सासूबाई', 'भागो मोहन प्यारे', 'अल्टी पल्टी', 'लग्नाची वाईफ वेडींगची बायको', 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' 'डान्सिंग क्वीन' आणि नवीन कारभारी लयभारी या मालिकांच्या शीर्षकगीतांसोबतच टायटल साँगही केलं आहे. अमित यांचे 'कला दूरीयां', 'सुरमई', 'झग्गा', 'सगुणा', 'धुके धुके', 'तेरी हाजरी (जावेद अली)' हे म्युझिक अल्बमही चांगलेच गाजले आहेत. जाहिरातींसोबतच विविध शोज करणाऱ्या अमित यांच्या कोरिओग्राफीची जादू रसिकांना 'सलमान सोसायटी', 'मातंगी', 'भाता', 'राडा', 'उनाड', 'कल्टी', 'रघू ३५०' या आगामी मराठी सिनेमांमध्येही पहायला मिळणार आहे.