महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे दहीहांडी. दरवर्षी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दहीहांडी उत्सवाचं आयोजन केलं जातं. अनेक ठिकाणी उंचच्या उंच थर लावले जातात. इतकंच नाही तर हे सात-आठ मजली गोविंदांचे थर पाहायला लोक तोबा गर्दी करतात. म्हणूनच, मोठ्या दणक्यात साजऱ्या होणाऱ्या या सणावर कलाविश्वातही अनेक गाणी तयार केली आहेत. तसंच काही सिनेमांमध्येही दहीहांडीचा जल्लोष दाखवला गेला आहे. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'हमाल दे धमाल'. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही दहीहांडी फोडली होती. विशेष म्हणजे या सीनवर चित्रीत झालेलं गाणं आजही आवर्जुन अनेक ठिकाणी लावलं जातं.
'अशी ही बनवाबनवी'पासून ते अगदी 'एक होता विदुषक' या सिनेमापर्यंत लक्ष्मीकांत यांचे अनेक सिनेमा गाजले. या सिनेमांसोबतच त्यातील गाणीही तितकीच लोकप्रिय झाली. त्यामुळे आजही लक्ष्मीकांत आपल्यात नसले तरीदेखील ते त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तर, 'धमाल दे धमाल' या त्यांच्या सिनेमातील 'बोल बजरंग बली की जय' हे गाण आजही तितक्याच आवडीने सगळीकडे लावलं जातं. हे गाणं ऐकल्यावर प्रत्येक गोविंदाच्या अंगात उत्साह सळसळतो.
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणं खऱ्या अर्थाने गाजलं. या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांची हटके डान्स स्टाइल विशेष लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे गिरगावच्या मध्यमवर्गीय राहणीमानाकडून त्यांना मिळालेली ही भेट होती. गिरगावमध्ये होणाऱ्या गणेशोत्सव, गोकुळाष्टमी या सण-उत्सवांमध्ये ते आवर्जुन सहभागी व्हायचे. त्यामुळे त्याचाच परिणाम त्यांच्या या गाण्यातही सुंदररित्या दिसून आला आहे.