सध्या गावागावात कोणताही कार्यक्रम असो गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स झालाच पाहिजे असं दिसतंय. लग्न असो, वाढदिवस असो किंवा राजकीय कार्यक्रम गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं. तरुणाई तर तिच्या डान्सवर आणि तिच्या हावभावावर फिदा असतात. तर यावेळी काहीतरी भलतंच घडलंय. डान्सर गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका नेत्याच्या मुलाच्या मांडव टिळा कार्यक्रमात गौतमीने 'बावऱ्या' बैलासमोर लोकप्रिय 'चंद्रा' गाण्यावर डान्स केला.
गौतमी पाटीलच्या डान्सचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र हा व्हिडिओ वेगळाच आहे. मुळशी तालुक्यात सुशील हगवणे युवा मंचाच्या वतीने मांडव टिळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्टेजमोरच चक्क बैलाला बांधण्यात आले होते. बैलाचं नाव 'बावऱ्या' असं आहे. बावऱ्या बैल म्हणजे गावाची शान असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. या बैलाने अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. बैलासमोर डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडिओ आता प्रचंड चर्चेचा विषय ठरलाय.
नेमकं कारण काय होतं?लग्नानिमित्त मांडव टिळा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये दाराबाहेर मांडव घालून नवऱ्या मुलाची बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते अशी प्रथा आहे. आजही गावागावात ही प्रथा पाळली जाते. मात्र इथे काहीतरी वेगळंच घडलं. मिरवणूक न काढता मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला गेला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून बैलाला कार्यक्रमस्थळी बांधण्यात आलं.
आता बैलासमोर गौतमीचा डान्स सुरु आहे म्हणल्यावर लगेच बघ्यांचीही गर्दी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही मिनिटांत तुफान व्हायरल झाला.पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे.