Join us

जीवनाचा संघर्ष शिकविणारा एक अलबेला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 10:46 AM

'भोली सुरत दिल के खोटे'या गाण्यावर पाय थिरकले नाहीत, तो विरळाच. लग्नाची कोणतीही वरात या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ...

'भोली सुरत दिल के खोटे'या गाण्यावर पाय थिरकले नाहीत, तो विरळाच. लग्नाची कोणतीही वरात या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. सामान्य माणसालाही नाचण्याची लकब भगवानदादा यांनी शिकविली. चित्रपटसृष्टीतला पहिला डान्सिंग स्टार म्हणून भगवानदादांची ओळख. त्याचबरोबर, निमार्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मात्र, नव्या पिढीला भगवानदादांच्या या देदीप्यमान कारकिदीर्ची माहिती नाही. मंगलमूर्ती प्रॉडक्शनने भगवानदादांचे जीवनचरित्र पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य पेलले. त्यासाठी अगदी विद्या बालनसारख्या अभिनेत्रीला मराठी चित्रपटसृष्टीत आणले, ही खरोखरच मराठीसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. त्यामुळेच 'एक अलबेला'हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, यात शंका नाही. आज अँक्शन, सोशल, हॉरर अशा पद्धतीचे जे काय चित्रपट तयार होत आहेत ते सर्व भगवानदादांची बॉलिवूड इंडस्ट्रीला देणगी आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. याच दिग्गज अवलियाच्या जीवनप्रवास दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी अप्रतिम मांडला आहे. माणूस म्हणून जगण्याचा सुंदर संदेश हा चित्रपट देतो.          वडील म्हणतात, 'तू आयुष्यात काही करू शकणार नाहीस.' या रागात घर सोडून गेलेला हा तरुण. 'जिंदगी अगर हर मोड पर ना कहे तो उसे हा में बनानाही जिंदगी है' अशा जबरदस्त डायलॉगवर भगवानदादा यांचा सुरू झालेला जीवनाचा प्रवास मंगेश देसाई या कलाकाराने साकारला आहे. भगवानदादा त्यांच्यामध्ये अवतरले आहेत काय, असे वाटावे इतका अस्सल अभिनय मंगेशने केला आहे. भगवानदादांची अभिनयाची आवड, या क्षेत्रात पदार्पण करण्याची जिद्द, त्यांची डान्स स्टाईल, स्टंट, इंडस्ट्रीतील फायटर कलाकारांना डान्सर बनविण्याची कला त्याचबरोबर अभिनयाबरोबर दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न दिग्दर्शकाने अत्यंत अचूक रेखाटले आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात राज कपूर यांच्या सांगण्यावरून भगवानदादा सामाजिक चित्रपट बनवितात. पण, सौंदर्याच्या अभावी सहन करावे लागणारे मानापमान, आर्थिक परिस्थिती त्यांनी मनोहारी पद्धतीने दाखविली आहे. हिंदीतील श्रेष्ठ अभिनेत्री गीता बाली हिला आपल्या चित्रपटात घेणारच, अशी लावलेली पैज भगवानदादा 'अलबेला' हा चित्रपट करून पूर्ण करतात. त्यांचा हा प्रवास प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देण्यासारखा आहे. यावरच न थांबता चित्रपट प्रदर्शनानंतरही पहिले काही दिवस फ्लॉप जाणारा चित्रपट काही दिवसांतच कसा हिट होतो, हे खरंच पाहण्यासारखं आहे. प्रत्येकालाच पुढे जाण्याचे बळ देणारादेखील आहे.    विद्या बालनने गीता बालीची भूमिका साकारून एका अथार्ने भगवानदादांना अनोखी श्रद्धांजलीच वाहिली आहे. 'शोला जो भडके दिल मेरा धडके', 'शाम ढले, खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो' या गाण्यांवर भगवानदादा स्टाईलमधील ठुमके तर लाजवाब. आयुष्याला शिस्त लागलीच पाहिजे. लायकीपेक्षा स्वप्नं मोठी नसतील तर ती काय कामाची, असे एकसे एक डायलॉग चित्रपटाला चार चाँद लावतात. भगवनादादांच्या समकालीनांच्या भूमिकाही चपखल दिसतात. मेकअपमन विद्याधर भुट्टे, कला दिग्दर्शक बबन अडागळे, कॅमेरामन उदय धिवारे या सर्व टीमने भगवान आबाजी पालव पूर्ण ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडलेला दिसत आहे.