Join us

दांडिया गाण्यांची मराठीत वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:18 AM

                  मराठी चित्रपटात उत्सव किंवा सण असला की पारंपारिक गाण्यांचाच भरणा अधिक ...

                  मराठी चित्रपटात उत्सव किंवा सण असला की पारंपारिक गाण्यांचाच भरणा अधिक असतो.. आता हेच पहा ना, नवरात्र म्हटले की 'जय अंबे जगदंबे सकलांची माता तू', 'माय भवानी तुझे लेकरू', 'एकवीरा आई, तू डोंगरावरी', ' सावरखेड एक गावमधील 'आई भवानी तुझ्या कृपेने', अगबाई अरेच्चामधील 'उदे गं आंबे उदे' आणि 'दुर्गे दुर्गट भारी' या आरत्यांचे गाण्यात केलेले रूपांतर अशी काही मोजकीच गाणी आपल्याला आठवू शकतात.अगदी ८0 ते ९0 च्या दशकापासून लक्ष्मी, दुर्गा आदी देवींच्या रूपांवर मराठी चित्रपटात गाणी बनली हे मान्य केले तरी ही गाणी भक्तिभावाने ऐकण्याचे प्रमाण जास्त आहे. दांडिया, गरबामध्ये वाजविल्या जाणा-या गाण्यांची मराठीमध्ये तशी वानवाच आहे.पण याऊलट हिंदी, गुजराथी किंवा राजस्थानी भाषेतील गाणी दरवर्षी केवळ गाजतच नाहीत तर प्रत्येक वर्षी त्यामध्ये नवीन गाण्यांची भरही पडते. आता हेच पहा ना, हिंदी चित्रपटातील जय जय संतोषी माता, मैं तो भूल चली बाबूल का देस, ढोली तारो ढोल बाजे, राधा कैसे ना जले, बानी बानी, नगाडा संग ढोल बाजे गुजराथी भाषेतील मारी म्हैसागर नी आरे ढोल, ऊॅं ची तलवाडी नी कोर, राधाजी ना ऊॅं चा मंदिर नीचा दहेरा तर राजस्थानी भाषेतील मैं तो गर्भा, ऊॅं चो माता जी, प्रेम सगाई, कोरे काजल अशी एक ना अनेक गाणी या नऊ दिवसात आपल्याला ऐकायला मिळतात आणि तरूणाईदेखील या गाण्यांवर बेधुंद होऊन थिरकताना दिसते. जर गणेशोत्सवासाठी हिंदी आणि मराठीमध्ये डान्स करण्यासाठी गाणी असू शकतात तर नवरात्रोत्सवामध्येही दांडियासाठी मराठी गाणी का असू शकत नाहीत? शांताबाय, लुंगी डान्स, देवा श्री गणेशा या मॉडर्न गाण्यांपासून ते गणपती माझा नाचत आला, अष्टविनायका तुझा महिमा अपार अशा अनेक पारंपारिक गाण्यांची गणेशोत्सवात चलती असते. यातील काही भक्तीभावासाठी लावली जातात तर काही धांगडधिंगा करता यावा म्हणून स्पेशल तयार केली जातात. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या नऊ दिवसातील सर्वाधिक आकर्षण असते ते भोंडला आणि दांडियाचे.. त्यातही सगळ्यात जास्त गर्दी खेचतात ती दांडियाची गाणी. मात्र ही गाणी असतात ते हिंदी किंवा गुजराथी भाषेतील. नवरात्र किंवा देवीच्या रूपांवर दांडिया खेळता येईल अशी गाणी मराठीत तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच.