Join us

'देवीच्या पायवर डोकं ठेउन दर्शन...'; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 6:56 PM

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. 

अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे  संकर्षण कऱ्हाडे.  मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याच्या कामाबद्दलच्या अपडेट तो शेअर करताना दिसतो. नुकतेच त्याने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. 

संकर्षण पोस्टमध्ये म्हणाला, 'सुप्रभात..आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव.. कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या; अंबाबाईच्या नित्योपचारात बदल होतो.. पहाटे २.३० वा. मंदिर उघडते आणि काकडा सुरू होतो. मशाल घेउन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरवात होते, ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलीत केला जातो. पहाटे ३ / ३.३० वा. सगळा परिसर कापूराच्या ज्योतीने ऊजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात'.

पुढे तो म्हणाला, 'हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “ऊठ ऊठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं देवीची काकडा आरती केली जाते. काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वा. मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पहाता आला… अनुभवता आला…. आणि तुम्हाला सांगतो ; देवीच्या पायवर डोकं ठेउन दर्शन घेता आलं” काय सांगावं कसं वाटलं.. माझे डोळे सतत भरून येत होते.. मनांत काय भाव आले हे सांगताच येणार नाही असा हा अनुभव होता', असे तो म्हणाला. 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने संकर्षणला घराघरात लोकप्रिय केलं. संकर्षणचा नुकताच 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमाही रिलीज झाला आहे. तर सध्या त्याचे 'नियम व अटी लागू' आणि 'तू म्हणशील तसं' हे दोन्ही नाटकं जोरात सुरु आहेत. कोणत्या नव्या भूमिकेतून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला येतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी