राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला 'पिप्सी' सिनेमा, आजपासून संपूर्ण महाराष्ट्राला, बालपणाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित हा सिनेमा प्रेक्षकांना, 'चानी' आणि 'बाळू' यांच्या निरागस मैत्रीची अल्लड सफर घडवून आणणार आहे. बालपणीच्या निस्वार्थ मैत्रीचे महत्व मोठे झाल्यावरच कळून येते. कोणताही लोभ किंवा अपेक्षा न ठेवता, मित्रासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असलेले मित्र बालपणीच लाभतात. 'पिप्सी' सिनेमात 'चानी' च्या मदतीला प्रत्येकवेळी धावत जाणारा 'बाळू', अश्याच एका जिवलग बालमित्रांचे प्रतिबिंब प्रेक्षकांसमोर मांडतो. त्यामुळेच तर 'बालपण देगा देवा' असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा हा सिनेमा ठरणार आहे.
लहान मुलांचे भावविश्व आणि वास्तविकतेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन'पिप्सी' सिनेमात आपल्याला पहायला मिळणार आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शितया सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी, मैथिलीला, यंदाच्या ५५ व्याराज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराने सन्मानित करण्यात आले आहे. सौरभ भावे लिखित 'पिप्सी' या सिनेमात, समाजातील घडामोडीचा दोन लहानग्या मित्रांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे.ग्रामीण भागातील दोन लहान मुलांची कथा या सिनेमात आहेत. आपल्या आजारी आईचा जीव एका माश्यात आहे, अश्या समजातून मित्र 'बाळू'च्या मदतीने एका माश्याच्या शोधात असलेली 'चानी' या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आशयसमृद्ध कथानक आणि सर्जनशील मांडणी असलेला 'पिप्सी' हा सिनेमा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये झळकला असून, यांमध्ये त्याने आपली विशेष छाप पाडली आहे. यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये'पिप्सी' सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच. २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.इ. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आणि नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येदेखील 'पिप्सी' चित्रपट झळकला आहे. इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी हाफ तिकीट सेक्शनमध्ये आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या बाल आणि तरुण विभागातदेखील ‘पिप्सी’ सिनेमाची खास स्क्रीनिंग झाली होती. अश्याप्रकारे विविध चित्रपट महोत्सवामधून मैत्रीच्या नात्याची परिभाषा जगासमोर मांडणारा ‘पिप्सी’ सिनेमा, आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील आपलेसे करण्यास येत आहे.
'पिप्सी' या सिनेमाच्या नावावरून अनेक चर्चा होताना दिसून येत आहे. सिनेमातील 'चानी' आणि 'बाळू'च्या गावातले हे आवडते शीतपेय असून, त्यांचा मासादेखील या 'पिप्सी' सारखाच काळा आणि गोड असल्याकारणामुळे, या दोघांनी त्या माश्याचे नाव 'पिप्सी' ठेवले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शिवाय, या सिनेमाचे टॅगलाईनदेखील 'अ बॉटल फूल ऑफ हॉप' असे असल्यामुळे, 'चानी' आणि 'बाळू' च्या आयुष्यातली 'पिप्सी'ची ही बाटली कोणती आशा निर्माण करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.