'जय मल्हार' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे.देवदत्त नागेचं (devdatta nage) खूप फॅन फॉलोइंग आहे. आजही चाहते त्याला खंडोबा म्हणून ओळखतात. देवदत्त नागेने अलीकडच्या काळात साउथ इंडस्ट्रीतही आपला जम बसवला आहे. इतकंच नव्हे २०२३ साली आलेल्या 'आदिपुरुष' सिनेमात (adipurush movie) देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली होती. या सिनेमात देवदत्तने साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. या भूमिकेसाठी देवदत्तने काहीच मानधन घेतलं नाही का? असा प्रश्न विचारला असता अभिनेता काय म्हणाला बघा
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देवदत्त नागे याविषयी म्हणाला की, "आदिपुरुषसाठी मी मानधन घेतलं असं नाही. मी मानधन घेतलं पण, ते मानधन किती घ्यायचं, काय घ्यायचं हे मी कणभर सुद्धा बोललो नाही. त्यामुळे माझं आणि श्रद्धाचं भांडण झालं. श्रद्धा ही आदिपुरुषची निर्माती होती. मी तिला म्हणालो श्रद्धा तू विचारुच कसं शकतेस मला, हे माझ्या घरचं आहे. टी सीरिजचे भूषण कुमारजी आणि इतरही माणसं खूप चांगली आहेत आणि माझ्या जवळची आहेत. ओम सर स्वतः सुद्धा आहेत तिकडे."
"त्यामुळे तुम्ही मला मानधनाबद्दल असं का विचारताय, हा माझा त्यांना प्रश्न होता. पण त्यांनी मला पैसे दिले. भरपूर दिले पैसे, नाही असं नाही. एवढं मात्र आहे की, मी सांगितलं नव्हतं तर त्यांनी दिले मला. मला मानधन मिळालं पण मी अजिबात सांगितलं नव्हतं. " अशाप्रकारे देवदत्त नागेने खुलासा केला. एकूणच 'आदिपुरुष'मध्ये हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी देवदत्तच्या मनात किती आस्था होती हे यावरुन दिसतं. २०२३ साली रिलीज झालेल्या 'आदिपुरुष' सिनेमात प्रभासने श्रीरामांची भूमिका साकारली होती तर क्रिती सेननने सीतेची भूमिका साकारली होती. देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसला तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत झळकला.