संजय जाधव ह्यांच्या ‘लकी’ सिनेमामध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता धैर्यशील आता मराठी सिनेमांनंतर बॉलिवूडकडे वळला आहे. अजय देवगणच्या आगामी 'तानाजी' सिनेमात धैर्यशील तानाजीच्या सैन्यातल्या मावळ्याच्या भूमिका साकारणार आहे.
‘गोष्ट एका जप्तीची’, ‘एकाच ह्या जन्मी जणू’ या टिव्ही मालिकांमधून झळकलेल्या धैर्यशीलने अवधूत गुप्तेच्या ‘एक तारा’ चित्रपटातही काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धैर्यशील तानाजी ही एक मोठी संधी मानतो.
धैर्यशील म्हणतो, “कोणत्याही अभिनेत्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम करणं, हे स्वप्नवत असतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यावर मी मराठी नाटक, मालिका, शॉर्ट फिल्म आणि कमर्शिअल फिल्म्समध्ये छोट्या-मोठ्या भूमिका वठवत गेलो. तेव्हा कधी ना कधी ग्लॅमरवर्ल्डमधल्या मोठ्या स्टार्ससोबतही आपण काम करावं ही इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण होतेय.”
तानाजीविषयी विचारल्यावर धैर्यशील म्हणतो, “मी आत्ताच माझ्या भूमिकेविषयी जास्त बोलू शकत नाही. सध्या सिनेमावर कसून मेहनत घेतोय. आणि मिळालेल्या संधींचं सोनं करण्याची इच्छा आहे.''
'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.२२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.