Join us  

करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:29 AM

प्रसाद ओकच्या आगामी 'धर्मवीर २' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली (dharmaveer 2)

२०२२ साली आलेल्या धर्मवीर सिनेमाने सुपरहिट यश मिळवलं. आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रसाद ओकच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक करण्यात आलं. प्रवीण तरडेंनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर २'ची घोषणाा करण्यात आली. परंतु सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल खुलासा झाला नव्हता. अखेर काल तोरणा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि कलाकारांच्या उपस्थितीत 'धर्मवीर २' चा रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय.

'धर्मवीर २' या तारखेला होणार रिलीज

 'धर्मवीर २' हा सिनेमा ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे पोस्टर मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

'धर्मवीर २'चे लक्षवेधी कमाल पोस्टर

'धर्मवीर २' सिनेमाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले आनंद दिघे झोपाळ्यावर बसलेले दिसतात. 'हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही' अशी ओळही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे. 'धर्मवीर २' या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे.

कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली दिघेंची भूमिका चांगलीच गाजली. त्यामुळे सर्वांना ९ ऑगस्टची उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :प्रसाद ओक एकनाथ शिंदेबॉबी देओलअशोक सराफमहेश कोठारे