Dharmveer 2 : आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'धर्मवीर २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला 'धर्मवीर २' २७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. कित्येक दिवसांपासून या 'धर्मवीर' सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'धर्मवीर २' सिनेमालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
'धर्मवीर २' सिनेमा प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही 'धर्मवीर २' चं राज्य पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'धर्मवीर २' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
'धर्मवीर २'चे निर्माते मंगेश देसाई यांनी सिनेमाच्या कलेक्शनबाबत पोस्टमधून अपडेट दिली आहे. यानुसार, 'धर्मवीर २' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे. २०२४ या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'धर्मवीर २' मराठी सिनेमा ठरला आहे. "पहिल्याच दिवशी नेट १.९२ कोटी कमवून धर्मवीर -२ सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट !! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!!", असं मंगेश देसाई यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, 'धर्मवीर २' सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.