Dharmveer 2 : आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'धर्मवीर २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला 'धर्मवीर २' २७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. कित्येक दिवसांपासून या 'धर्मवीर' सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'धर्मवीर २' सिनेमालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
पहिल्या दिवसापासूनच 'धर्मवीर २'ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींमध्ये कमाई करण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी सिनेमांचा रेकॉर्ड या सिनेमाने मोडला.'धर्मवीर २' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १.९२ कोटींचा गल्ला जमवला. २०२४ या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'धर्मवीर २' मराठी सिनेमा ठरला. त्यानंतर वीकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली.
चारच दिवसांत धर्मवीर २ने बॉक्स ऑफिसवर ९.२७ कोटींचा गल्ला जमवला होता. अजूनही सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. धर्मवीर २चं सहा दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने सहा दिवसांत तब्बल १२.२८ कोटींचा बिजनेस केला आहे.
'धर्मवीर २' सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.