Join us  

रक्ताचं पाणी करून घर घेतलंय! प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला - "लोकांना वाटतं शासकीय कोट्यातून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:37 PM

प्रसादने मुलाखतीत त्याच्या घराची गोष्टही सांगितली. पुण्यातून मुंबईत अभिनयात करिअर करण्यासाठी आलेल्या प्रसादने २०२४च्या सुरुवातीला मुंबईत त्याचं स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. लग्नाच्या २५व्या वाढदिवशी प्रसादने पत्नी मंजिरीला मुंबईत स्वत:चं घर गिफ्ट म्हणून दिलं.

उत्कृष्ट अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक असलेला प्रसाद ओक धर्मवीर २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारून प्रसादने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सध्या प्रसाद धर्मवीर २च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादने अभिनयातील करिअर, धर्मवीर २ याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

प्रसादने नुकतीच लेट्स अप मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. प्रसादने मुलाखतीत त्याच्या घराची गोष्टही सांगितली. पुण्यातून मुंबईत अभिनयात करिअर करण्यासाठी आलेल्या प्रसादने २०२४च्या सुरुवातीला मुंबईत त्याचं स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. लग्नाच्या २५व्या वाढदिवशी प्रसादने पत्नी मंजिरीला मुंबईत स्वत:चं घर गिफ्ट म्हणून दिलं. 

याबाबत प्रसाद म्हणाला, "१९९७-९८ साली मी मंजूला पुण्याहून एशियाडने पहिल्यांदा मुंबईत घेऊन आलो होतो. दादरला आम्ही उतरलो. तेव्हा ती मला म्हणाली की आता आपण अंधेरीला जायचं का? तिला अंधेरीचं प्रचंड आकर्षण होतं. कारण, बरेच सेलिब्रिटी याच भागात राहतात हे पेपरमध्ये वाचलेलं होतं. तेव्हा मी तिला सांगितलं की नाही आपण बोरीवलीला जात आहोत. बोरीवलीनंतर मग आम्ही कांदिवलीमध्ये २३ वर्ष राहत होतो. पण, नेहमी आमचा विषय व्हायचा की अंधेरीत घर कधी घेणार? मुलांचं शिक्षण वगैरे सांभाळून आम्ही थोडी थोडी बचत करत होतो. मंजूचं ते स्वप्न पूर्ण करायचंच होतं. मागच्या वर्षी आमच्या लग्नाला २५ वर्ष झाली. मग म्हटलं यावर्षी हे गिफ्ट नाही द्यायचं तर मग कधी देणार". 

"ते तिचं स्वप्न होतं. तिला हवं तसं घर आम्हाला बरोबर त्याच वेळेला मिळालं. मला असं वाटतं की या सगळ्यासाठी डॉ. लागू, निळूभाऊ, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिघे साहेब या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. या सगळ्यांच्या आशीर्वादाची ती पुण्याई आहे, असं मला वाटतं. लोकांना असं वाटतं की याला घर असंच मिळालं आहे. पण, ते तसं नाही. भयंकर खस्ता खाऊन, रक्ताचं पाणी करून हे घर झालेलं आहे. हे घर असंच कोणीही दिलेलं नाही. किंवा शासकीय कोट्यातून मिळालेलं नाही. हा लोकांचा गैरसमज आहे. पण, हे मी स्वत:च्या हक्काने, कुणाचंही लांगुलचालन न करता मिळवलेलं घर आहे", असं प्रसाद म्हणाला. 

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतासेलिब्रिटी