Join us

विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

By कोमल खांबे | Updated: February 18, 2025 18:39 IST

उत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती धर्मवीर फेम बालकलाकाराने केली आहे.

सध्या विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. त्याच्या या उत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती धर्मवीर फेम बालकलाकाराने केली आहे. 

धर्मवीर फेम अथर्व वगळ या बालकलाकाराने 'छावा' पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट पत्रच लिहिलं आहे. विकी कौशलला महाराष्ट्र भूषण देऊन गौरविण्यात यावं अशी विनंती त्याने या पत्रात केली आहे. तर रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनाही १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणीही त्याने केली आहे. 

अथर्व वगळचं मुख्यमंत्र्यांना पत्र! 

प्रती,

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब.मा. मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

विषय - "छावा" चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल यांना 'कला क्षेत्रात' उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र भूषण" हा राज्य सरकारचा 'सर्वोच नागरी पुरस्कार' देऊन तसेच अभिनेत्री रश्मिका मंदाना व दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना 'विशेष पुरस्कार' देऊन येत्या १ मे २०२५ रोजी "महाराष्ट्र दिनी" सन्मानित करावे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळेतील मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातील सरकारी व निमसरकारी, दिल्ली बोर्ड शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हा भव्यदिव्य "चित्रपट शो मोफत" दाखवण्यासाठी 'विशेष उपाययोजना' करावी ही विनंती.

मा महोदय,

मी अथर्व वगळ ठाण्यातील एक बालकलाकार आहे. ठाण्यातील श्रीमती सिंघानिया शाळेत मी शिक्षण घेत आहे. वरील विषयास अनुसरून मी आपणास विनंती करत आहे की "हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" होती असं श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं होतं. मराठ्यांच्या भव्यदिव्य पराक्रमाचा सुवर्ण इतिहास डोळ्यासमोर ठेवून चित्रपट रुपात एक ऐतिहासिक सुंदर कलाकृती निर्माण करण्यात आली आहे. 

"मराठी पाऊल पडते पुढे" त्या वेळच्या काळातील महापराक्रमी जिवंत इतिहासातील साक्षात श्री छत्रपती संभाजी महाराज पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर साक्षात अवतरले असा भास होतो. एवढा भव्यदिव्य सिनेमा मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी धाडस करून आपला जीव ओतून कुठेही इतिहासाची मोडतोड न करता बनविला आहे हे विशेष व संपूर्ण प्राचीन काळातील ऐतिहासिक अजरामर इतिहास 'याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा.' जगासमोर मांडून ही भव्यदिव्य कलाकृती सादर करण्यासाठी उत्कृष्ट चित्रपट बनविला आहे. हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने "टॅक्स फ्री" करावा अशी विनंती मी आपणास श्री. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री महोदय व श्री. एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री महोदय यांना दी. १४/०२/२०२५ रोजीच ट्विट करून या आधीच केलेली आहे. कृपया आपण महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांना कमी दरात हा चित्रपट पाहता यावा यासाठी मदत करावी. 

"छावा" या चित्रपटातील उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा श्री छत्रपती संभाजी महाराज यांची अजरामर भूमिका साकारलेला लाजवाब अभिनय, रश्मिका मंदाना यांनी साकारलेली महाराणी येसूबाई यांची अप्रतिम व्यक्तिरेखा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास पाहिल्यावर एक विलक्षण अनुभव व महाराजांचे प्रेरणादायी संवाद ऐकून अंगावर शहारे येऊन आणि महाराजांनी आपल्या स्वाभिमानासाठी व स्वराज्यासाठी, रयतेसाठी त्याकाळी भोगलेल्या हालअपेष्ठा, यातना पाहिल्यावर डोळ्यांत पाणी घेऊनच प्रेक्षक निःशब्द होऊनच थेटर बाहेर अभिमानाने पडतोय. 

"विकी" यांनी आपले अभिनय कौशल्य पुन्हा दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान शूरवीर व्यक्तींचा आदर्श मांडणाऱ्याना या भव्यदिव्य चित्रपटाच्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता विकी कौशल यांना "महाराष्ट्र भूषण" हा राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन व अभिनेत्री रश्मिका मंदाना व मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सुद्धा कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने 'विशेष पुरस्कार' प्रदान करून येत्या १ मे २०२५ रोजी "महाराष्ट्र दिनी" देऊन गौरविण्यात यावे ही विनंती. 

तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळेतील मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातील सरकारी व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हा भव्यदिव्य "चित्रपट शो मोफत" दाखवण्यासाठी विशेष उपाययोजना करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील भव्यदिव्य इतिहासाची जाणीव होईल, इतिहासाची गोडी निर्माण होईल आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रातील राज्यांनी स्वराज्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी किती योगदान दिले याची जाणीव होईल. कारण आजकाल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व बोर्ड सोडून, महत्वाचे म्हणजे दिल्ली बोर्डाच्या 'सीबीएसई' व 'आयसीएसई' इंग्रजी माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत इतिहासाच्या पुस्तकात फक्त एक ते दोन पानाचा इतिहास समाविष्ट करून शिकवला जातो. त्यामुळे आपला इतिहास किती प्राचीन, मोठा व भव्यदिव्य पराक्रमी आहे हे विद्यार्थी दशेतील शालेय शिक्षण घेणाऱ्या भावी पिढ्यांना दाखवून व समजून देण्याची आज आवश्यकता आहे आणि हा छावा चित्रपट म्हणजे त्याचे एक उत्कृष्ट ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदय कृपया आपण माझ्या विनतीची दखल घ्यावी ही नम्र विनंती..

धन्यवाद..आपला विश्वासु,कु. अथर्व जयेश वगळ (बालकलाकार)

अथर्व याच्या या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याने धर्मवीर सिनेमात खासदार श्रीकांत शिंदे यांची बालपणीची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलदेवेंद्र फडणवीस