Join us

Exclusive: अरे आम्ही काय बरं करतच नाही तर...? मराठी चित्रपटांबाबत वैभव मांगले स्पष्टच बोलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 5:09 PM

Dhondi Champya Marathi Movie : ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या निमित्ताने, भरत जाधव, वैभव मांगले आणि निखिल चव्हाण यांनी ‘लोकमत फिल्मी’च्या ‘ फिल्मी पंचायत’मध्ये हजेरी लावली. मग काय, प्रश्नोत्तरांचा ‘सिलसिला’ सुरू झाला. 

Dhondi Champya Marathi Movie : ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ हा धम्माल विनोदी सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित झाला. होय, हा सिनेमा म्हणजे धोंडी म्हशीची  आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची एक अनोखी प्रेमकहाणी. धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी -आदित्यची प्रेमकहाणीही यात खुलताना दिसणार आहे. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव (Bharat Jadhav), वैभव मांगले (Vaibhav Mangle), सायली पाटील, निखिल चव्हाण ( Nikhil Chavan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने, भरत जाधव, वैभव मांगले आणि निखिल चव्हाण यांनी ‘लोकमत फिल्मी’च्या ‘ फिल्मी पंचायत’मध्ये हजेरी लावली. मग काय, प्रश्नोत्तरांचा ‘सिलसिला’ सुरू झाला. 

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय, असं मानलं जातंय, याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न यावेळी करण्यात आला. यावर वैभव मांगले याने आपलं स्पष्ट मत मांडलं.

तो म्हणाला, ‘मराठी सिनेमाची गळचेपी होतेय,असं सरसकट म्हणत असाल तर त्याला माझा थोडासा विरोध आहे. जेव्हा ‘सैराट’ चालला तेव्हा हिंदीचे सिनेमे देखील काढून घेतले होते. मधल्या काळात इतर काही मराठी सिनेमांबद्दलही असंच घडलं. मराठी सिनेमाची 50 तिकिटं विकली गेल्यावर तिकिटं परत केली जात असतील तर तो गुन्हा आहे, अन्याय आहे.  पण मुळात 3 तिकिटं विकली गेली असतील आणि अशावेळी या तीन तिकिटांसाठी मला शो नाही करता येणार, माझा खर्च त्याच्यापेक्षा जास्त आहे, असं थिएटर मालक म्हणत असेल तर मला सांगा, यात कोण कुणावर अन्याय करतो? थिएटर मालकांना धंदा काय नकोय का? चालणारा सिनेमा काढून टाकला तर त्याविरोधात आंदोलन व्हायला हवीत. पण सिनेमा चालतच नसेल, लोक पाठ फिरवत असतील तर कसं म्हणायचं? मराठी कलाकार या नात्याने माझे सिनेमे चालत का नाहीत? यावर जास्त चर्चा व्हायला पाहिजे. तीन तिकिटं, दोन तिकिटं परत दिली म्हणून तोडफोड करणार असाल तर मराठी सिनेमा मोठा कसा होईल? हा माझा मुद्दा आहे. नाटकाला 400-500 रूपयांचं तिकिट घेऊनही प्रेक्षक येतात नाटकाला. का? कारण आम्ही ते सकस त्या पैशाचं लोकांना देतो. त्या तुलनेत मराठी सिनेमा कुठेय? याचा विचार व्हायला हवा. हा प्रेक्षकांचा अजिबातच दोष नाही. मराठी प्रेक्षक येतंच नाही, असे आम्ही काही करतंच नाही बरं, तर प्रेक्षक कुठून येतील?’

हे महाराष्ट्राचं दुर्दैव...महाराष्ट्राचं दुर्दैव हे की आम्हाला हिंदी समजतं.  बोलता येत नसलं तरी आम्हाला हिंदी कळतं. साऊथमध्ये हिंदी समजत नाही.तमिळ माणसाला तमिळंच कळतं. त्याला हिंदी कळत नाही, तेलगू कळत नाही. तेलगू व मल्याळी माणसाचं पण सेम असतं. आमचं तसं नाही. आम्हाला हिंदी कळतं, त्यामुळे आम्ही हिंदीकडेच वळतो. मराठी नाटक ही भारतामधील एकमेव रंगभूमी जी इतकी प्रगत आणि  शाश्वत मूल्य देणारी रंगभूमी आहे. तिला पर्याय नाही. म्हणून तिला कोणी हात घालू शकत नाही..., असंही वैभव मांगले म्हणाला.

 

टॅग्स :वैभव मांगलेभरत जाधवमराठी अभिनेतामराठी चित्रपट