Join us

​शेतकऱ्यांना सकारात्मक ऊर्जा देणारा 'धोंडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 10:52 AM

बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला विवेक चाबुकस्वार 'धोंडी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शेतकऱ्यांना सकात्मक ऊर्जा देणारा हा ...

बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला विवेक चाबुकस्वार 'धोंडी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शेतकऱ्यांना सकात्मक ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. ९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे. सयाजी शिंदे, पूजा पवार, विनय आपटे, विवेक चाबुकस्वार अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. विवेकनं या चित्रपटात शेतकऱ्याच्या भूमिकेत असलेल्या सयाजी शिंदे यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. आत्महत्या करू पाहणाऱ्या आपल्या वडिलांना हा दाद्या कशा प्रकारे परावृत्त करतो, याचं रंजक कथानक या चित्रपटात आहे. 'अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे. मला ही भूमिका करताना खूप मजा आली. वडील मुलाचं एक भावनिक नातं या चित्रपटात आहे. सयाजी शिंदे, विनय आपटे, पूजा पवार यांच्यासारखा दिग्गज कलाकारांसह या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांबरोबर काम करण्याचं दडपण होतं. मात्र, सर्वांनीच मला सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी आत्मविश्वासानं काम करू शकलो. तसंच दिग्दर्शक मोनिष पवार स्वत: शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांना नेमकं काय करायचं हे माहीत होतं. त्यांचंही खूप छान मार्गदर्शन मिळालं,' अशी भावना विवेकनं व्यक्त केली. शेतकऱ्यांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. विवेकच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.