Join us

रोहित आणि जुईलीच्या जोडीचं गाणं तुम्ही ऐकलंत का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 06:00 IST

रोहित राऊत आणि  गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र येऊन चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. याआधी त्यांनी एकत्र ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’चे मॅशअप केले आहे.

ठळक मुद्देरोहित राऊत- जुईली जोगळेकरने पहिल्यांदा केले पार्श्वगायन एकत्र ‘येना शोना येना’ हे त्यांचे गाणे लाँच झाले आहे

रोहित राऊत आणि  गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र येऊन चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आगामी बॉईज-2 ह्या चित्रपटात ह्या दोघांचे पहिले गाणे ऐकायला मिळणार आहे. नुकतेच युट्यूबवरून ह्या चित्रपटातले अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केलेले ‘येना शोना येना’ हे त्यांचे गाणे लाँच झाले आहे.

या गाण्यासंदर्भात रोहित राऊत सांगतो, “इतके वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. पण एका चित्रपटात एकत्र गाणं गाण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली. आम्ही काही दिवसांपूर्वी लोकाग्रहास्तव एकत्र कवर साँग गायलो होतो. त्याला चांगला प्रतिसाद आल्यावर आता हे रोमँटिंक गाणे गाण्याची संधी आम्हाला मिळाली. अवधूतदादाने या गाण्याला खूप छान संगीतबध्द केले आहे त्यामुळे गाणे पटकन ओठांवर रूळणारे आहे”

जुईली जोगळेकर ह्या गाण्यासंदर्भात सांगते, “अवधूतदादा माझा आवडता संगीतकार आहे. माझा आवाज खूप बोल्ड असल्याने मला रोमँटिक गाणे गाण्याची संधी खूप कमी मिळते. पण अवधूतदादाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हे रोमँटिक गाणे गाण्याची संधी दिली, याचा मला आनंद आहे. मध्यंतरी मी आणि रोहितने आमच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून लाइव चॅट केले होते. त्यावेळी आम्ही एकत्र पार्श्वगायन करावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. ती ह्या गाण्यामुळे पूर्ण झाली आहे.” 

 लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जाते. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात. 

टॅग्स :बॉईज २रोहित राऊत