Join us

निवेदिता सराफ यांचं पाळण्यातील नाव माहितीये का? या कारणामुळे बदललं नाव, स्वत:च सांगितला मजेदार किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 2:07 PM

निवेदिता सराफ यांचं पाळण्यातलं नाव काहीतरी वेगळंच होतं. यामागचा मजेदार किस्सा त्यांनी स्वत: सांगितला आहे.

निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुमधडाका', 'फेका फेकी' अशा चित्रपटांतून काम करुन त्यांनी ९०चा काळ गाजवला. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं. त्यांचे आई आणि बाबा दोघेही उत्कृष्ट कलाकार होते. दोघांनही रंगभूमीवर काम केलं आहे. त्यामुळे निवेदिता सराफ यांनी त्यांच्या लहानपणीच अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. निवेदिता सराफ म्हणून आज घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्री  पाळण्यातलं नाव काहीतरी वेगळंच होतं. त्यांच्या बहिणीने त्यांचं नाव ठेवलं होतं. याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.

निवेदिता सराफ यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं खरं नाव सांगितलं. त्या म्हणाल्या, ''मला समजायला लागल्यापासून मला अभिनेत्रीचं बनायचे होते आणि अभिनय या क्षेत्रातच यायचं होतं. माझे वडील गजानन जोशी हे रंगभूमीवरचे खूप मोठे अभिनेते होते. माझी आई विमल जोशी हिने देखील अगदी संजीव कुमार, बलराज साहनी यांच्यासोबत काम केलंय. तिने 'कस्तुरीमृग', 'नटसम्राट' अशी बरीच नाटकं केली. याशिवाय ४५ वर्ष तिने  ऑल इंडिया रेडिओवर काम केलं. माझे वडील खूप लवकर गेलं. ते फक्त ४२ वर्षांचे होते. त्यामुळे खूप कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. आई बाबांचं नाटक असलं की मला बबन प्रभू सांभाळायचे. ते बाबांचे खास मित्र होते. माझं शाळेत नाव वेगळं ठेवलं होतं आणि त्यांनी येऊन ते बदललं. माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आणि तिला हे नाव ठेवावंसं वाटलं. पण आईने का ते नाव ठेवायचं.'' 

पुढे त्या म्हणाल्या, ''त्यावेळी चंदाराणी का गं दिसतेस रुसल्यावानी, हे गाणं खूप लोकप्रिय झाले होतं. तिला ते फार आवडायचं. त्यामुळे तिला धाकट्या बहिणीचं नाव चंदाराणी ठेवायचं होतं. तिने ते ठेवलं पण.  . बबन काकाच्या आग्रहामुळे माझं नाव बदललं. त्यांनी माझं नाव निवेदिता ठेवलं.'' 

टॅग्स :निवेदिता सराफ