अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तुमचे आमचे आवडते अशोक मामा आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करतायेत. त्यांना मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले जाते. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांची आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.
अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा निवेदिता केवळ सहा वर्षांच्या होत्या. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली. निवेदिता यांच्या वडिलांनी लेकीची ओळख अशोक यांच्याशी करून दिली होती.
काही कालावधीनंतर निवेदिता यांनीहीदेखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली. नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटात काम करताना त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न निवेदिता यांच्या घरतल्यांना मान्य नव्हते. आपल्या मुलीने सिनेइंडस्ट्रीतील व्यक्तीशी लग्न करू नये अशी आईची इच्छा होती. त्यामुळे सुरूवातीला घरातून तीव्र विरोध झाला. मात्र निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे घरातल्यांना नमते घ्यावे लागले.
अशोक आणि निवेदिता यांचा विवाह गोव्यातील मंगेशीच्या देवळात पार पडला. मंगेशी हे सराफ यांचे कुलदैवत आहे आणि याच मंदिरामध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. लग्न झाल्यानंतर अशोक आणि निवेदिता दोघेही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते.
निवेदिता सराफ यांनी काही काळ वैवाहिक आयुष्यासाठी आणि त्यांच्या मुलासाठी अभिनयाच्या क्षेत्रात ब्रेक घेतला. मुलगा मोठा होईपर्यंत निवेदिता चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलं सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.