अभिनयाचा वाहता झरा म्हणजे निळू फुले. भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने संपूर्ण सिनेसृष्टी गाजवली. मराठी म्हणू नका की बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला. आपल्या घोगऱ्या, बसक्या आवाजामुळे त्याने केवळ सहकलाकारालाच नाही तर प्रेक्षकांनाही भीतीच्या कवेत घेतलं. विशेष म्हणजे खलनायकाप्रमाणेच त्यांच्या नायकच्या भूमिकाही गाजल्या. त्यामुळे आज त्यांचं नाव मानाने घेतलं जातं. परंतु, निळू फुले या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचं खरं नाव फार कमी जणांना माहित आहे.
आज निळू फुले यांचे अनेक सिनेमा गाजतात. परंतु, सिनेमासोबतच त्यांचे काही संवादही लोकप्रिय आहे. इतकंच कशाला तर आजही अनेक जण दैनंदिन जीवनात त्यांचे डायलॉग्स वापरतात. त्यामुळे मराठी प्रेक्षक वर्गावर निळू फुलेंचा फार मोठा प्रभाव आहे. विशेष म्हणजे निळू फुले या नावाने सर्वश्रुत असलेल्या अभिनेत्याचं खरं नाव निळू असं अजिबात नाही. परंतु, ते याच नावाने नावारुपास आले. म्हणूनच त्यांचं खरं नाव काय ते जाणून घेऊयात.
काय आहे निळू फुलेंचं खरं नाव?
एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या निळू फुले यांनी सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला आहे. एकेकाळी त्यांनी भाजी विकायचं काम केलं. इतकंच नाही तर वानवडीच्या एका लष्करी महाविद्यालयात त्यांनी माळी म्हणूनही काम केले होते. ४ एप्रिल १९३० मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचं नाव नीळकंठ ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचं खरं नाव नीळकंठ कृष्णाजी फुले असं आहे.