आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आजवर अनेक कलाकारांनी महाराष्ट्राचा डंका परदेशात गाजवला आहे...आजवर ऑस्करला गवसणी घालू शकलो नाही तरी अनेक मराठीसिनेमांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवलेत. या सिनेमांमधील कलाकारांच्या लक्षवेधी भूमिकांमुळे त्यांना पुरस्कार देवून गौरवण्यात देखील आलंय...असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीपला आपण श्वास, मोगरा फुलला, डबल सीट अशा विविध सिनेमांमध्ये साकारलेल्या अप्रतिम व्यक्तिरेखांसाठी ओळखतो. नुकताच संदीपनं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरल...आणि मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय...संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे.
राख या मराठी सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपनं हा पुरस्कार आपल्या नावावर केला. संदीपने स्वत फोटो शेअर करत ही माहिती दिलीये. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, आनंदाची बातमी- कॅनडा येथील काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२ मध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याच्या या पोस्टवर त्याचे सिनेइंडस्ट्रीतील मित्र मैत्रणिंनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. संदीप पाठक हा लवकरच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत आपडी थापडीमध्ये झळकणारेय. या सिनेमा चं शुटिंग नुकतच कोकणात पार पडलं.यावेळचे सेटवरीच मजामस्ती संदीपने शेअर केली आहे.