मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? ३६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि चित्रपट आजही आहेत लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:00 AM2021-12-11T07:00:00+5:302021-12-11T07:00:00+5:30
ही अभिनेत्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. आता तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.
१९८४ साली हेच माझं माहेर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा…., कळले काही तुला…. कळले काही मला.. अशी गाणी या चित्रपटात होती जी खूप लोकप्रिय ठरली. सुलभा देशपांडे, मधू कांबीकर, रविंद्र महाजनी, अशोक सराफ, रंजना, मोहन गोखले, शर्मिला मेढेकर हे कलाकार या चित्रपटात होते. फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, नाही ना...तर या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला मेढेकर-कुलकर्णी. शर्मिला मेढेकर कुलकर्णी बऱ्याच कालावधीपासून मराठी चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत.
हेच माझं माहेर या चित्रपटाला रिलीज होऊन ३६ वर्षे उलटली आहेत. ये अबोली लाज गाली..आणि कळले काही तुला…ही गाणी मोहन गोखले आणि शर्मिला मेढेकर-कुलकर्णी यांच्यावर चित्रित झाली होती. शर्मिला यांनी हेच माझं माहेर चित्रपटाव्यतिरिक्त ‘घाबरायचं नाही’ या मराठी चित्रपटात आणि ‘सोम मंगल शनी’ (१९८८) या हिंदी चित्रपटात काम केले होते.
शर्मिला यांनी प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केले. सतीश कुलकर्णी यांनी श्री तुलसी प्रॉडक्शन ही निर्मिती संस्था सुरू केली यातून अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
एका पेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, जमलं हो जमलं, लपून छपून अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात देखील आले आहे.