झी स्टुडिओने गेल्या काही वर्षांत सैराट, फँड्री, नाळ, टाइमपास, ती सध्या काय करते यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आता त्यांच्या खारी बिस्कीट या चित्रपटात काही चिमुरड्यांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
खारी बिस्कीट म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिने असंच एक स्वप्न पाहिलंय वर्ल्डकपला जाण्याचं! नुकत्याच रिलीज झालेल्या फिल्मच्या ट्रेलर मधून आपल्याला हे पाहायला मिळत आहे.
झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी खारी बिस्कीट या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने साकारलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'खारी बिस्कीट'चे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या गाण्यात या भावंडांचे प्रेम आपल्याला पाहायला मिळाले होते. या गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धनचे असून या गाण्याचे संगीतकार सुरज-धीरज ही जोडगोळी असून कुणाल गांजावालाने गायलेले हे गाणं प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या गाण्याप्रमाणेच खारी बिस्किट हा चित्रपट देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.