८ फेब्रुवारीला 'प्रेमवारी' हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय सुंदर, भावुक आणि अनोखी अशी एक प्रेमकहाणी आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजीत चव्हाण आणि भारत गणेशपुरे अशा दमदार कलाकारांची फौज या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून भारत गणेशपुरे यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा आपण अनुभवणार आहोत. नेहमीच आपल्याला हसवणारे भारत गणेशपुरे या सिनेमातून एका गरीब मजदुरी करणाऱ्या अशा वडिलांची भूमिका बजावत आहे. 'दीन' असूनही समाधानी आणि आयुष्य नेहमी आनंदाने जगणारा असा हा बाप भारत गणेशपुरे साकारत आहे. त्यांच्या आजवरच्या अभिनयाच्या या प्रवासाबद्दल भारत गणेशपुरे सांगतात, " एक हास्य कलाकार म्हणून काम करत असताना अशा भूमिका करायला मला कधीच अडचण वाटत नाही उलट मी अशा भूमिकांना एक संधी म्हणून स्विकारत असतो. कारण एक कलाकार म्हणून तुम्ही विविध प्रकारच्या भूमिका करणे गरजेचे असते. कोणत्याही एका चौकटीत अडकायला किंवा काही भूमिकांसाठीच मर्यादित व्हायला मला आवडत नाही. त्यामुळे मी ही संधी स्वीकारली. आणि मी आता पर्यंत फक्त विनोदीच भूमिका केल्या असे नाही. मी काही सिनेमांमध्ये विनोदी, तर काही खलनायकी भूमिका सुद्धा वठवल्या आहेत. आणि या भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी मला अगदी सहज स्वीकारले. तशा प्रतिक्रिया सुद्धा मला मिळाल्या होत्या. मग, आपण ज्या प्रेक्षकांसाठी काम करतोय त्याच प्रेक्षकांना मला अशा विविध भूमिकांमध्ये पाहायचे आहे, तर मी का या भूमिका नाकारू? शेवटी आपण काम याच प्रेक्षकांसाठीच तर करतो ना. आणि मी नेहमी भूमिका स्वीकारताना ही भूमिका विनोदी आहे किंवा ही भूमिका गंभीर आहे असा विचार करत नाही. मला फक्त ती भूमिका आवडली कि ती कोणतीही भूमिका असो मी ती करतोच. पण मी भूमिका साकारताना तिचा अतिरेक होणार नाही या कडेसुद्धा लक्ष देतो." असे हे नेहमी आपल्याला हसवणारे भारत गणेशपुरे यावेळी मात्र गंभीर भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. 'प्रेमवारी' हा सिनेमा येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. व्हॅलेंटाइन वीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आठवड्यात प्रेम या विषयावर आधारित चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट लोकांसमोर येणार आहे. या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.