Join us  

हर हर महादेव...! ‘पावनखिंड’ने दहा दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 2:13 PM

Pawankhind Box Office Collection : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

Pawankhind Box Office Collection: शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहेत. दिग्पाल लांजेकर  (Digpal Lanjekar) दिग्दर्शित हा मराठी सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची घोडदौड सुरू झाली. फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालेल्या ‘पावनखिंड’ने गेल्या दहा दिवसांत कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवला आहे.  

दिग्गज ट्रेंड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार, ‘पावनखिंड’ने दुसऱ्या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 12 कोटी 17 लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी या चित्रपटाने 1.02 कोटींचा बिझनेस केला. शनिवारी 1.55 कोटी तर रविवारी 1.97 कोटींची कमाई केली. म्हणजेच दहा दिवसांत या चित्रपटाने एकूण 16.71 कोटींचा बिझनेस केला.

दिग्पाल यांनी तरण आदर्श यांचा ट्विटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर करत, ‘हर हर महादेव’ असं कॅप्शन दिलं आहे.

‘पावनखिंड’ पावनखिंड या चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अजय पुरकर यांनी शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.   समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे.  

 लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा  ‘पावनखिंड’ हा चित्रपट शिवराज अष्टकातील तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या  फर्जंद आणि  फत्तेशिकस्त  या त्यांच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजस ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. तर शनिवारी 421 चित्रपटगृहांमध्ये 1910 शोज लागले.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरसिनेमा