Join us

'शिवरायांचा छावा' चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित; ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:15 PM

छत्रपती संभाजी महाराजांचा अतुलनीय इतिहास  'शिवरायांचा छावा' या सिनेमातून उलगडून दाखवण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराजांचा अतुलनीय इतिहास  'शिवरायांचा छावा' या सिनेमातून उलगडून दाखवण्यात येणार आहे.

 दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  धुरा सांभाळली आहे. तर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) यांनी उचललं आहे.  नुकतेच 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  शंभूराजांच्या साहसी मोहीमा आणि अंगावर रोमांच उभे करणारे संवाद ऐकायला येत आहेत. 'शिवरायांचा छावा' सिनेमा १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

दिग्पाल लांजेकर यांच्या 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय, चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटामधील डायलॉग्स या सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. आता त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिनेमातून पुन्हा एकदा ऐतिहासीक सिनेमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटीसिनेमा