‘सुभेदार’ या ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराजअष्टक मधील हा पाचवा चित्रपट असून नरवीर तान्हाजी मालुसरेंचा जीवनपट यातून पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. सुभेदार चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. या मुलाखतीत त्यांनी शिवराज अष्टकमधील चित्रपटावेळी आलेले अनुभव शेअर केले.
“शिवराज अष्टक सुरू केल्यानंतर प्रेक्षकांच्या विचारसरणीत काही फरक पडल्याचं तुम्हाला जाणवतं का?” असा प्रश्न दिग्पाल लांजेकरांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी एक प्रसंग शेअर केला. “ठाण्याच्या कारागृहात काही बालगुन्हेगार होते. यातील आठ बालगुन्हेगारांबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांनी एक प्रयोग केला. काही महिने त्यांनी शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे चार चित्रपच त्यांना सातत्याने दाखवले. हे चित्रपट वारंवार दाखवल्यानंतर काही महिन्यांनी ती मुलं ढसाढसा रडली. आमचे पूर्वज काय होते आणि आम्ही काय करत आहोत, असं ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आम्ही चोरी, पाकीटमारी करतोय. आम्ही खूप वाईट आयुष्य जगत आहोत. आम्हाला चांगलं आयुष्य जगायचं आहे. यांच्यासारखं मानाने उभं राहायचं आहे. त्यानंतर त्यातील काही जणांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. त्यांनी पदवीसाठी अडमिशन घेतलं. काही जण ठाण्याच्या बाजारात वडापाव आणि भाजीची गाडी लावतात. असा मानाचा व्यवसाय करुन त्यांनी गुन्हेगारी पूर्णपणे सोडली,” असं दिग्पाल लांजेकर ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
Video: सोनाली बेंद्रेला ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाली, “५० दिवस बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट...”
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार चित्रपटात अभिनेता अजय पूरकर तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिजाबाईंच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच समीर धर्माधिकारी, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.