शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा जवान ७ तारेखला रिलीज झालाय. रिलीजच्या दिवशीच जवानने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत बॉलिवूडचा बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरलाय. बिग बजेट हिंदी सिनेमा समोर असताना सुद्धा सुभेदार सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार प्रेक्षकांना या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे. २५ ऑगस्टल प्रदर्शित झालेल्या सुभेदार सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलंय. सिनेमाच्या टीमने खास पोस्टर शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय.
तान्हाजी मालुसरेंनी कोंढाणा जिंकून तो स्वराज्यात सामील केला होता. हा गड राखण्यासाठी ते धारातीर्थी पडले होते. त्यांच्या या बलिदानानंतर कोंढाणाचे नाव बदलून सिंहगड असे करण्यात आले होते. सिंहगडाच्या लढाईची गोष्ट सांगणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसचा गड राखला आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे. बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, सुभेदारने गेल्या १३ दिवसात बॉक्स ऑफिसवर १३.२३ कोटींची कमाई केलीय. हिंदी सिनेमाच्या गर्दीत मराठी सिनेमाने केलेली कमाई ही खरंतर कौतुकास्पद आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज आणि मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.