दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकमधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. ‘सुभेदार’च्या टीमकडूनही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ‘सुभेदार’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली होती. १८ ऑगस्टला हा ऐतिहासिक सिनेमा प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा ‘सुभेदार’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. सिंहगड आणि तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याचा थरार यानिमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पण, १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानंतर प्रदर्शनाची तारीख बदलून १८ ऑगस्ट करण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता ‘सुभेदार’ सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणारा काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव,” असं चिन्मय मांडलेकरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेता अजय पूरकर नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.