बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत ‘सुभेदार’ हा ऐतिहासिक मराठी सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’नंतर दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तान्हाजी मालुसरेंनी प्राणांची आहुती देत गड राखला होता. सिंहगडाच्या लढाईचा थरार या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘लोकमत’शी खास संवाद साधला.
दिग्पाल लांजेकरांना या मुलाखतीत “सिंहगडाच्या लढाईत काही ठिकाणी घोरपडे बंधू आणि घोरपडीचा उल्लेख आढळतो. असे ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात दाखवताना कशाप्रकारे निर्णय घेतला जातो?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, “आपला इतिहास काही ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आणि कागदपत्रांच्या अभावी अपुरा आहे. त्यामुळे काही गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत. अशावेळी मग तेव्हाच्या काळात परिस्थिती काय असू शकते याचा विचार केला जातो. ऐतिहासिक सिनेमांमध्ये एवढीच लिबर्टी घ्यावी. कथानक रंजक करण्यासाठी स्वत:च्या कल्पनेतील काहीही दाखवू नये, असं मला वाटतं.”
पुढे सिंहगडाच्या लढाईतील घोरपडीच्या उल्लेखाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “सिंहगडाच्या लढाईत घोरपडीचा उल्लेख फक्त एका पोवाड्यात आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख आढळत नाही. अशावेळी आम्ही दोनपेक्षा जास्त संदर्भग्रंथात ( कादंबरी किंवा कविता नाही) प्रसंगाचा उल्लेख असेल, तरच ते गृहित धरुन चित्रपटात त्याची मांडणी करतो,” असं त्यांनी सांगितलं.
‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेता अजय पुरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.