'सारेगमप' २००७ च्या विजेत्या आणि 'बाजीराव मस्तानी'मधील 'पिंगा' गाण्याच्या तालावर सर्वांना नाचायला लावणाऱ्या मराठमोळ्या गायिका वैशाली माडे यांचे एक नवीन अल्बम साँग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित 'डिजेवाला दादा' या वैशाली माडे यांच्या आवाजातील नव्या गाण्याचे रेकॉर्डींग अंधेरी येथील अशोक होंडा स्टुडिओमध्ये नुकतेच पार पडले. झी मराठी वरील 'लागीर झालं जी' या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, 'ये रे ये रे पावसा' चित्रपटाचे टायटल साँग, 'लव्ह लफडे' चित्रपटातील 'ताईच्या लग्नाला' यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुंवर यांनीच 'डिजेवाला दादा' हे गाणे देखील संगीतबद्ध केले आहे.
हे गाणे खास डीजेवाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवले असल्याचे या गाण्याचे गीतकार कौतुक शिरोडकर सांगतात. या गाण्याला योग्य तो ठसकेबाजपणा आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नवोदित मराठी अभिनेत्री दिपाली सुखदेवे ही या गाण्यातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून या गाण्याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
आजकाल लग्न समारंभ अथवा इतर कोणत्याही सण समारंभात डीजेचा वापर सर्रास होताना दिसतो. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आत्तापर्यंत आली आणि हिट देखील झाली. पण हे गाणे या सर्वांत वेगळे आहे कारण याची शब्दरचना इतरांपेक्षा वेगळी आहे. 'भावा, मित्रा, दादा' सारखे आदरार्थी शब्द आणि वैशाली माडे यांच्या आवाजाचा अस्सल मराठमोळा ठसका हे या गाण्याचे वेगळेपण आहे. डीजेवाल्यासाठी पहिल्यांदाच असे शब्द याच गाण्यात वापरले गेलेत. त्यामुळे थोड्या आगळ्या-वेगळ्या धाटणीचे हे हटके गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत नक्की उतरेल यात शंकाच नाही.