Join us

'हसवाफसवी' नाटक पहिल्यानंतर 'नटसम्राट' श्रीराम लागूंची काय होती पहिली प्रतिक्रिया ? दिलीप प्रभावळकरांनी सांगितली खास आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:08 PM

'हसवाफसवी' हे नाटक पहिल्यानंतर डॉ.श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिले होते.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही आपल्या अभिनयाने गाजवली. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी मराठी-हिंदी इंडस्ट्रीत एक काळ गाजवला.  सिंहासन, पिंजरा या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. केवळ गाजल्या नाहीत तर लोकांनी त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं इतक्या त्या लोकप्रिय झाल्या. आपल्या अभिनयाच्या विविध छटा दाखवत लागू यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. डॉ. श्रीराम लागू आज आपल्यात  नसले तरी त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत. नुकतंच अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणी आपल्या  'पत्रा पत्री' या प्रयोगात जागवल्या. 

दिलीप प्रभावळकर लिखित 'पत्रा पत्री' या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत. या प्रयोगात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांची खास आठवण सांगितली. ‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ.श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं दिलीप प्रभावळकर म्हणाले.

'माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं' या खेळाच्या आठवणी अनेकांच्या आठवणीत असतील. मात्र आता हा खेळ हरवलायं आणि ते पत्रसुद्धा.  हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात  चिरंतन दरवळतो. म्हणूनच नाट्यरसिकांसाठी  दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्यासही नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची दीलिप यांना साथ लाभली आहे. बदाम राजा प्रॉडक्शन्स निर्मित अभिवाचन-दृक आविष्कार असलेल्या 'पत्रा पत्री'मध्ये पत्रवाचन केले जाते. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, 'पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी 'पत्रा पत्री' चा प्रयोग करण्याचं ठरवलं. प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत'. तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चं दिग्दर्शन विजय केंकरे यांचं असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना  शीतल तळपदे तर  वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर श्रीराम लागूसेलिब्रिटीमराठी अभिनेता