दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या दशक्रिया या चित्रपटाच ट्रेलर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:39 AM
दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या दशक्रिया या चित्रपटाच ट्रेलर लाँच नुकताच करण्यात आला.
विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच तीन राष्ट्रीय व अकरा महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कल्पना विलास कोठारी यांच्या 'रंगनील क्रिएशन्स' निर्मित आणि संजय कृष्णाजी पाटील लिखित, प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित दशक्रिया या बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटातील सर्व प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत सिटी लाईट चित्रपटगृहात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर २०१७ला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या दशक्रिया या चित्रपटाचा ट्रेलर जनसामान्य आणि दर्दी रसिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करेल आणि चित्रपटगृहात त्यांना येण्यास प्रेरित करेल असे मत लोकप्रिय अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने या चित्रपटातील जवळपास सगळेच प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.प्रथम पदार्पणातच तीन राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर आपले नाव कोरून दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी आपली दिग्दर्शनातील चुणूक दाखवत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान मिळून आपली वेगळी छाप सोडली आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचं अवघड स्वप्न पाहत कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. यापूर्वी त्यांनी अभिनय आणि निर्मिती करत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती केली आहे. 'दशक्रिया' सारख्या एका अत्यंत वेगळ्या विषयावरील निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्मितीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास'सारख्या दर्जेदार आणि रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी 'दशक्रिया'ची पटकथा, संवाद, गीते लिहिली आहेत. दशक्रियाची कथा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या बहुचर्चित 'दशक्रिया' या साहित्यकृतीवर आधारित आहे. 'दशक्रिया' या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचे वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, बालकलाकार आर्या आढावयांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली आहे. विनोदी अभिनेते आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी देखील यात विशेष भूमिका साकरल्या आहेत.Also Read : एनफडीसीच्या फिल्म बाजार मध्ये 'दशक्रिया'ची निवड!