Join us

मोरुची मावशी या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 5:33 AM

'मोरुची मावशी' हे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकांपैकी एक नाटक मानले जाते. या नाटकाने विजय चव्हाण यांना एक वेगळी ओळख ...

'मोरुची मावशी' हे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकांपैकी एक नाटक मानले जाते. या नाटकाने विजय चव्हाण यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (४ मे) सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.आपल्या प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरूची मावशी', 'बिघडले स्वर्गाचे दार' ही नाटकं विशेष गाजली होती. 'शेजारी शेजारी' हा चित्रपट कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केला होता. शेजारी शेजारी या चित्रपटात अशोक सराफ, वर्षा ऊसगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, निशिगंधा वाड यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचे फेब्रुवारी महिन्यातच निधन झाले होते. कर्वेनगर येथील त्यांच्या बंगल्यात जळलेल्या अवस्थेत त्यांची पत्नी दिपाली कोल्हटकर यांचा मृतदेह सापडला होता. त्यांची हत्या घरातील नोकरानेच केली असल्याचे उघड झाले होते. पोस्टमार्टेम अहवालानुसार, दीपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने प्रहार केल्याचे यातून स्पष्ट होत होते. शिवाय त्यांचा गळा आवळला असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा नोकर त्यांच्या घरी रोज रात्री बारापर्यंत थांबत असे. मात्र, घटना घडली त्या दिवशी तो एक तास आधीच निघून गेला होता. याच कारणामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. संशयाच्या बळावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने खूनाची कबुली दिली होती.दीपाली कोल्हटकर यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत दिलीप कोल्हटकर यांचे निधन झाल्यामुळे कोल्हटकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.