- संजय घावरे
'संगीत देवबाभळी' हे मराठी रंगभूमीवर गाजलेले भद्रकाली प्रोडक्शनचे नाटक आता 'दिंडी' स्वरूप धारण करून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या सेवेत सादर होणार आहे. यासोबतच मराठी रंगभूमीवर माईल स्टोन ठरलेले 'वस्त्रहरण' हे विक्रमी मालवणी नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणार असल्याची माहिती निर्माते प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
'देवबाभळी'च्या दिंडी या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कांबळी यांच्यासोबत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, सूत्रधार गोट्या सावंत, विजय पाध्ये, जयप्रकाश जातेगावकर आदी मंडळी उपस्थित होती. 'संगीत देवबाभळी' या नाटकाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर ९ मार्चपासून 'देवबाभळी'ची दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जागर करणार असल्याचे प्रसाद कांबळी म्हणाले. ९ मार्च २०२३ रोजी तुकाराम बीजजेच्या मुहूर्तावर नागपूरहून 'देवबाभळी'ची दिंडी निघणार आहे. हा 'धावा जनामनाचा-विदर्भ दौरा' असेल. ९ मार्च ते १९ मार्च२०२३ दरम्यान नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, नाशिक असा धावा जनामनाचा दौरा केला जाईल. पुढचा धावा कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा इतर ठिकाणी जिथे मराठी भाषा आणि मराठी मने असतील तिथे होईल. तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि अखेरीस कार्तिक एकादशीच्या दिवशी ही दिंडी थांबवण्याचा निर्धार केला आहे. 'शेवटचे काही प्रयोग' असे जाहीर करीत असताना हा धावा आयोजित केल्याचेही कांबळी म्हणाले. याखेरीज आळंदी ते पंढरपूर या वारीत लोणंदनंतरच्या टप्प्यात खास वारीतील वारकऱ्यांसाठी 'देवबाभळी'चे मोफत प्रयोग सादर करण्याचा मानस जातेगावकर यांनी व्यक्त केला आहे. हा जागर पुढे २३ नोव्हेंबर म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत सुरू राहणार असून, या काळात विविध ठिकाणी 'देवबाभळी'चे प्रयोग केले जातील.
४४व्या वर्षात पुन्हा 'वस्त्रहरण''वस्त्रहरण' या गाजलेल्या नाटकाला ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत मराठी नाट्यसृष्टीतील सेलिब्रिटीजना घेऊन प्रयोग करण्यात येणार आहेत. या नाटकाने देश विदेशात ५२५४ प्रयोग सादर करण्यात आले आहेत. ५२५५वा प्रयोग मोठ्या थाटात सादर करण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही कांबळी यांनी सांगितले.