सध्या शाहरुख खानच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जिकडेतिकडे सर्वत्र केवळ 'जवान'चीच चर्चा सुरू आहे. किंग खानच्या 'जवान'ने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण, बॉक्स ऑफिसवर एक मराठी सिनेमा शाहरुखच्या 'जवान'ला टक्कर देत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा 'जवान'ला तगडी टक्कर देत आहे.
'सुभेदार' हा दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील पाचवा सिनेमा आहे. शूरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा 'सुभेदार' सिनेमातून मांडण्यात आली आहे. सिंहगडाच्या लढाईसाठी प्राणांची आहुती दिलेल्या मालुसरेंचा प्रवास रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट हिंदी सिनेमांच्या गर्दीत बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या घोडदौड करत आहे. तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसल्यानंतर या चित्रपटाने आता चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलं आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.