हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राज्यात काही ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली आहे.
हर हर महादेवचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले की, आम्ही कोणताही चुकीचा इतिहास सिनेमात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट मिळाले आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही सेन्सॉर बोर्डकडे पुरविले आहेत. त्यानंतरच या सिनेमाला हिरवा कंदिल देण्यात आला. कोणत्याही सिनेमाला अशीच मान्यता मिळत नाही. ऐतिहासिक सिनेमासंदर्भात सेन्सॉर बोर्डच्या पॅनेलवर इतिहासकारही असतात. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे हे चुकीचे आहे.
हर हर महादेव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवर चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा आक्षेप घेतला जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत देशपांडे म्हणाले, आमच्या टीमकडून याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. आक्षेप घेतलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, ऐतिहासिक संदर्भ याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल.
हर हर महादेव सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका निभावली आहे तर शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत आहे. मराठीसह तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.