काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं. चिन्मय यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. चिन्मय यांनी दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक सिनेमांमध्ये शिवरायांची भूमिका साकारली. या सर्व प्रकरणावर दिग्पाल यांनी मौन सोडलंय.
दिग्पाल लांजेकरांनी लोकमत फिल्मीशी बोलताना याविषयी खुलासा केला ते म्हणाले, "माझी अजून त्यासंदर्भात चिन्मय यांच्याशी कोणतीही चर्चा नाही झाली. आमचं एक जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं आहे. पण हा निर्णय घेण्याआधी काहीच चर्चा झाली नाही. चर्चा आज होणं आज अपेक्षित आहेत. शिवराज अष्टकमधील शिवाजी महाराजांची भूमिका माझ्या मते अजूनतरी चिन्मयच करणार आहेत. आमच्यात चर्चा झाल्यावर अंतिमतः काय निष्पन्न होईल ते कळेल. सध्या मी काही बोलायला समर्थ नाही, आणि मला अनेक गोष्टींची कल्पना नाही.
दिग्पाल यांनी पुढे शिवराज अष्टक सिनेमांचा उल्लेख करत म्हटलं की, "कारण या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. शिवराज अष्टक फा फक्त सिनेमाचा भाग नाही. तर लोकांच्या भावनेचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. त्यामुळे चिन्मय यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय काहीही बोलणं चुकीचं ठरेल." आता दिग्पालशी चर्चा केल्यावर चिन्मय शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयात फेरबदल करेल का, याची सर्व प्रेक्षकांना आशा आहे.