Maharashtra Shahir Teaser Release : जय जय महाराष्ट्र, महाराष्ट्राची लोकधारा कानावर पडताक्षणी दिवंगत शाहीर साबळे ( Shahir Sable )आठवतात. आता मोठ्या पडद्यावर त्यांच्या आयुष्यावरचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा घेऊन येत आहेत. काल महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर रिलीज (Maharashtra Shahir Teaser Release ) करण्यात आला.चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक केदार शिंदे यांचं असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका कोण साकारणार? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. तर आता त्याचंही उत्तर मिळालं आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) शाहीर साबळेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. केदार शिंदे यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.
‘ महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा जाहीर झाला त्या दिवसापासून रसिक प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. शाहीर साबळे ह्यांचा भव्य दिव्य जीवनपट मोठ्या पडद्यावर कोणता कलाकार साकारणार? शाहीर साबळे ह्यांनी महाराष्ट्राला दिलेला संगीताचा अभूतपूर्व ठेवा आजच्या काळात पुन्हा जिवंत करण्याचं कार्य कोण संगीतकार पार पाडणार? ह्या महाराष्ट्र दिनी, ह्या काही प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्या मोशन पोस्टरद्वारे.. महाराष्ट्र शाहिराचा प्रेरणादायी जीवनपट महाराष्ट्राला अर्पण होणार...,’अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया, या गो दांड्यावरून ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.
3 सप्टेंबर 1923 या दिवशी साताऱ्याजवळील पसरणी गावात शाहीर साबळे जन्म झाला. त्याचे वडील भजनं गायचे. लहानपणापासूनच त्याच्यावर संगीताचे संस्कार झाले आणि त्याच्यातील कलावंताच्या जडणघडणीची सुरुवात झाली आणि नंतर महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील हे महत्त्वाचं नाव ठरलं. महाराष्ट्रभर फिरून सगळी लोकगीतं संकलित केली. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक नाटकाशी जोडलं. मुक्तनाट्य हा नवा प्रकार सुरू केला.