ठळक मुद्दे‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे
डॉ सलील कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेला मराठी चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’बाबत अनेक रह्सयं एकेक करून उलगडत असताना आणखी एक नवीन व अभिमानास्पद बाब समोर आली आहे. ती चित्रपटाच्या निर्मात्यांबद्दल. या चित्रपटाची सह-निर्मिती करणाऱ्या ‘गेरुआ प्रोडक्शन्स’चे चारही संस्थापक हे परदेशी मराठी माणसे असून त्यांनी ही निर्मिती मराठीच्या प्रेमापोटी केली आहे. “अमेरिकेत राहूनही आमची मराठीवरील श्रद्धा कमी झालेली नाही, उलट ती वाढलीच आहे. मराठी भाषेसाठी आणि या भाषेतील कलेसाठी, संगीतासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यातूनच या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती झाली आहे,” असे उद्गार या संस्थापकांनी काढले आहेत.
सिएटलचे मोहित चिटणीस म्हणाले की, मुक्ता बर्वे, अलका कुबल, शिवाजी साटम, भाऊ कदम, प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, त्यागराज खाडीलकर, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट सर्वांसाठीच एक निखळ मनोरंजन करणारा अनुभव असेल याची आम्हाला खात्री आहे. “गेरुआ प्रॉडक्शन्सतर्फे पुढेही असेच उत्तम दर्जेदार चित्रपट करायला मिळावे अशी आमची मनापासून इच्छा आहे,” ते म्हणतात.
बोस्टन येथे राहणाऱ्या अरुंधती दाते, बे एरियातील अनुप निमकर, न्यू जर्सी येथील अतुल आठवले आणि सिएटलचे मोहित चिटणीस यांनी गेरुआ प्रॉडक्शन्सची स्थापना केली आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या "बादरा रे" या गाण्याची निर्मिती करण्याच्या निमित्ताने या चौघांनी दोन वर्षांपूर्वी ‘गेरुआ प्रॉडक्शन’ची स्थापना केली आणि कलानिर्मितीचा एक निखळ आनंददायी अनुभव मिळवला. त्याआधी हे सर्व आपापल्या शहरांमध्ये स्थानिक मराठी मंडळे, बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून मराठी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि चित्रपट-नाटकांची आयोजने करत आले आहेत.
“गेरुआ प्रॉडक्शन्स’तर्फे एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा आमच्यासाठी एक सुंदर योगायोगच होता, जो डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्यामुळे घडून आला आहे. आम्ही सर्वच अमेरिकेमध्ये अनेक वर्षे स्थायिक झालो आहोत, पण इथे स्थायिक झालेल्या आमच्या इतर मराठी स्नेहीँसारखेच आमचेही मातृभाषेवरचे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही. किंबहुना इथे राहिल्यावर ते जास्तच वाढले. आम्हा सगळ्यांना मराठी साहित्य, संगीत, आणि नाटकाची मनापासून आवड असल्यामुळे गेली अनेक वर्षे आम्ही आपापल्या शहरांमधे स्थानिक मराठी मंडळे, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि स्वतःच्या विविध संस्थांतर्फे कार्यरत आहोत. त्याच्यामुळे पंडित हृदयनाथ मंगेशकर, शिरीष कणेकर, श्रीधर फडके, प्रशांत दामले, राहुल देशपांडे, आणि सलील कुलकर्णी अशा अनेक दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम आपापल्या शहरात आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्यांच्याशी स्नेहबंधही जुळले,” असे उद्गार अरुंधती दाते यांनी काढले.
प्रदर्शित होणारे अनेक मराठी चित्रपटही आपापल्या शहरात दाखवण्याची जबाबदारीही या सर्वांनी पेलली आहे. “या सर्वातूनच, आम्ही चौघे अमेरिकेच्या चार टोकांना रहात असूनही आमची एकमेकांशी छान ओळख झाली. आम्ही आपापल्या मंडळांच्या नाटक, संगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमातही वेळोवेळी सहभागी झालो. कलानिर्मितीच्या क्षेत्रात अजून काहीतरी करायला मिळावे अशी इच्छाही मनामध्ये हळूहळू रेंगाळू लागली आणि मग स्वतःचेच एक प्रोडक्शन हाउस चालू करून त्यामार्फत उत्तम आशयपूर्ण चित्रपट, भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा वारसा जपणारे संगीत व्हिडीओ आणि नाविन्यपूर्ण वेब सिरीज यांची निर्मिती करण्याचा मनापासून प्रयत्न करावा अशी कल्पना डोळ्यांसमोर आली,” निमकर सांगतात.
दोन वर्षांपूर्वी तशी संधी चालून आली. डॉ सलील कुलकर्णी यांच्या "बादरा रे" या गाण्याची निर्मिती करण्याच्या निमित्ताने ‘गेरुआ प्रॉडक्शन्स’ची स्थापना केली गेली. “त्यानंतर लगेचच डॉक्टर सलील यांची कथा व दिग्दर्शन असलेल्या “वेडिंगचा शिनेमा” या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करण्याची संधीही त्यांनी आम्हाला दिली. या चित्रपटाची कथा पूर्ण झाल्यापासून ते चित्रपट पूर्ण करण्यापर्यंतचा प्रवास हा आमच्यासाठी खूपच अवर्णनीय अनुभव होता. त्या प्रत्येक टप्प्यात जाणवली ती डॉ सलील यांची कलेवरची नितांत श्रद्धा आणि स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वृत्ती. आता आम्हाला वेध लागले आहेत ते १२ एप्रिलचे, म्हणजे चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसाचे,” अतुल आठवले म्हणाले. पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरानन देणारा बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.
या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे.