मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर(Swapnil Bandodkar)ने राधा ही बावरी हे गाणे अनेक कार्यक्रमात गायलं आहे. राधा ही बावरी प्रमाणे गालावर खळी, ओल्या सांजवेळी, का कळेना कोणत्या, गणाधिशा, परी म्हणू की सुंदरा, वादळवाट, मला वेड लागले अशी अनेक गाणी त्याने गायली आहेत आणि ती आजही रसिकांच्या ओठावर रुळताना दिसतात. या गाण्याची क्रेझ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. बेधुंद, तुला पाहिले, मितवा, तू माझा किनारा अशा अनेक अल्बममधून तो लोकप्रिय झाला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि स्वप्नील बांदोडकर यांच्यात कौटुंबिक नातेसंबंध आहेत हे फार कमी लोकांना माहित आहे.
पल्लवी जोशीने सारेगमप आणि अंताक्षरीसारख्या रिएलिटी शोमधून सूत्रसंचालिका म्हणून काम केले होते. पल्लवी जोशी यांच्या आई सुषमा जोशी या उत्तम गायिका तसेच संगीत शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे जोशी कुटुंबियाच्या घरातील वातावरण संगीतमय असायचे. बालपणापासूनच पल्लवी जोशी आणि अलंकार जोशी बॉलिवूड चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारताना दिसले आहेत. स्वप्नील बांदोडकरची पत्नी संपदा बांदोडकर ही पल्लवी जोशींची मावस बहीण आहे. या नात्यामुळे स्वप्नील बांदोडकर हे पल्लीवी जोशीचे मेहुणे लागतात. त्यामुळे संगीत क्षेत्राशी त्यांच्या कुटुंबाचं अगदी घट्ट नातं विणलं आहे.
स्वप्नील बांदोडकर याची पत्नी संपदा ही देखील पार्श्वगायिका आहे. पुण्यातील संक्रम म्युजिक अकॅडमी येथे त्या डिपार्टमेंट हेड म्हणून कार्यरत आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या संपदा बांदोडकर यांनी संगीत शिक्षिका म्हणून अनेक नवख्या कलाकारांना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच अनेक मंचावरून त्यांनी आपल्या गायकीची झलक दाखवून दिली आहे. स्वप्नील बांदोडकर प्रमाणे संपदा बांदोडकर यांनी देखील संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
पल्लवी जोशीचे संपूर्ण कुटुंबच सिनेइंडस्ट्रीशी संबंधीत आहे. आई गायिका तर तिचा भाऊ अलंकार जोशी हा बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून नावारूपाला आला होता तर त्यांची बहीण पद्मजा जोशी कदमनेदेखील मराठी चित्रपटात काम केले आहे. पद्मजा जोशी विजय कदम यांच्याशी लग्न केले आहे.