१९९३ साली रिलीज झालेला झपाटलेला (Zapatlela Movie) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), महेश कोठारे (Mahesh Kothare), पूजा पवार (Pooja Pawar) हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, झपाटलेला चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. झपाटलेला हा चित्रपट ‘चाइल्डस प्ले’ (Childs Play) या चित्रपटाची कॉपी आहे हा चित्रपट १९८८ साली रिलीज झाला होता आणि याचे एकूण ३ पार्ट बनवण्यात आले होते.
झपाटलेला चित्रपट येण्याआधीच हॉलिवूडमध्ये १९८८ साली चाइल्डस प्ले बनला होता. झपाटलेला चित्रपटाची ही संकल्पना याच चित्रपटातून घेतली गेल्याचे बोलले जाते. झपाटलेला चित्रपटात सुरूवातीला बाबा चमत्कार तात्या विंचूला अमर होण्याचा मंत्र देतो त्या मंत्राचा वापर करून मरतेवेळी तात्या विंचू त्याचा बाहुल्यावर प्रयोग करतो आणि बाहुल्यात तात्या विंचू याचा आत्मा जातो. अगदी याच प्रमाणे चाइल्डस प्ले या चित्रपट देखील चक्की दाखवला आहे.
ज्याप्रमाणे महेश कोठारे त्याचा खात्मा करतो त्याच प्रमाणे चाइल्डस प्ले चित्रपटात देखील इन्स्पेक्टर डेंजरस डाकूला संपवतो आणि तो डाकू मंत्रांचा वापर करून त्याचा आत्मा बाहुल्याच्या आत टाकण्यात यशस्वी होतो. महेश कोठारे यांनी चाइल्ड्स प्ले चित्रपटाच्या संकल्पनेवर मराठी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वीदेखील ठरले.
महेश कोठारे यांनी उत्तम कलाकारांची निवड करून झपाटलेला हा चित्रपट बनवला आहे. यात कॉमेडी सोबत थरारक दृश्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. आजही प्रेक्षक हा चित्रपट वारंवार तितक्याच आवडीने पाहतात.