सत्तरच्या देशातील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे करिअर फार काळ नव्हते. मात्र त्यांनी जेवढे चित्रपटात काम केले तेव्हा ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. फक्त रुपेरी पडदाच नाही तर रंगभूमीवरदेखील प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते.
पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे ७ जुलै १९४४ रोजी झाला. लहानपणापासूनच पद्मा यांना अभिनय व नृत्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ लागली होती. त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांनी आपल्या लेकीला कधीच विरोध नाही केला.
चित्रपटांसोबतच रंगभूमीवरही त्यांचे आगमन झाले. त्यांचा अभिनय शहरी व ग्रामीण कथानकानाही पूरक होता. दिलखेचक व बिनधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अभिनयामुळे ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा अँटम बॉम्ब’ हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते. गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकातील सुनीता, माझी बायको माझी मेव्हणी मधील रसिका, लग्नाची बेदी मधील रश्मी अशा त्यांच्या बऱ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या. या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांची नाटके अक्षरशः डोक्यावर घेतली.अभिनयाची घोडदौड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत १९६६ साली पद्मा यांचे लग्न झाले. पद्मा यांनी आकाशगंगा, अवघाची संसार, जोतीबाचा नवस, संगत जडली तुझी न माझी, बोट लावीन तिथे गुदगुल्या, लाखात अशी देखणी सारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले. सुमारे २८ मराठी चित्रपटात त्यांनी काम केले.