१९८० साली फटाकडी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अशोक सराफ, उषा किरण, सुषमा शिरोमणी, रमेश देव, य़शवंत दत्त, विजू खोटे, निळू फुले, श्रीराम लागू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केले आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजे फटाकडीची भूमिका अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे लेखनदेखील सुषमा शिरोमणी यांनीच केले होते. सुषमा शिरोमणी (Sushma Shiromani) यांनी या चित्रपटाशिवाय बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. आता त्या सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या आहेत आणि आता त्यांना ओळखणंदेखील कठीण झाले आहे.
सुषमा शिरोमणी यांचे नाव घेतले की डोळ्यासमोर येतात ते ‘भिंगरी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारिंगी’ चित्रपट. १९७६ ते १९८६ या दहा वर्षांमध्ये सुषमा शिरोमणी यांनी बऱ्याच सिनेमांची निर्मिती केली. त्यांची निर्मिती असलेले सगळे चित्रपट स्त्रीप्रधान होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या भूमिका पडद्यावर त्यांनी स्वत: साकारल्या होत्या.
तसेच आयटम साँग ही संकल्पना मराठी चित्रपटांमध्ये मराठमोळ्या ढंगात त्यांनीच लोकप्रिय केली होती. त्यांच्या ‘भिंगरी’ चित्रपटातील गाण्यावर अरूणा इराणी, ‘फटाकडी’ चित्रपटात रेखा, ‘मोसंबी नारिंगी’मध्ये जितेंद्र, ‘गुलछडी’मध्ये रती अग्निहोत्री आणि ‘भन्नाट भानू’मध्ये मौसमी चटर्जी या कलाकारांनी नृत्य केले होते. इम्पा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेतही त्या बरेच वर्षे सक्रिय होत्या. मिथुन चक्रवर्ती, धर्मेद्र, नीलम, मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत त्यांनी ‘प्यार का कर्ज’ या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली.