'धुमधडाका' चित्रपट १९ ऑगस्ट, १९८५ साली रिलीज झाला. मया चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कोठारे यांनी केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, शरद तळवलकर, प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मात्र आज या अभिनेत्रीला ओळखताही येणार नाही अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे.
ऐश्वर्या राणे यांनी 'धुमधडाका' चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे खूप गाजले होते. मात्र अशोक सराफ यांच्या प्रियतम्मेला आता ओळखणंही कठीण झाले आहे.
ऐश्वर्या यांना मर्द या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला होता. या सिनेमात घोडेस्वारी करताना त्या पडल्या आणि त्यांच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यानंतर उपचारासाठी त्या परदेशात देखील गेल्या होत्या. मात्र उपचाराचा खर्च त्यांना परवडला नाही. त्या ट्रिटमेंटसाठी त्यांनी घर, दागिने इतकेच नाही तर एफडीही मोडल्या. यानंतर त्या कायमच्या सिनेसृष्टीपासून दूरावल्या.