अशी ही बनवा बनवी चित्रपट १९८८ साली रिलीज झाला. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या चित्रपटात लिलाबाई काळभोर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांनी साकारली होती.
अभिनेत्री नयनतारा यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर अधिराज्य गाजविले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार चित्रपटात काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईची भूमिका नयनतारा यांनी साकारली होती. या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची ऑनस्क्रीन आई असे देखील म्हटले जात असे. आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुखकर्ता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई यासारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.