Join us

'हमाल दे धमाल' चित्रपटातली ही अभिनेत्री आठवतेय का? तब्बल ३४ वर्षानंतर आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 6:00 AM

लक्ष्मीकांत बेर्डेंचा १९८९ साली रिलीज झालेला हमाल दे धमाल चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेंनी केले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा १९८९ साली रिलीज झालेला हमाल दे धमाल चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेंनी केले आहे. एका हमालाला सुपरस्टार कसं बनवलं ही कथा हमाल दे धमाल चित्रपटात दाखवण्यात आले. या चित्रपटात निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, महेश कोठारे, गिरीश घाणेकर, सुधीर जोशी, रमेश भाटकर, अशोक शिंदे यांच्यासह ते अगदी आदेश बांदेकर पर्यंत बरेचसे कलाकार छोट्या मोठ्या भूमिकेत झळकले. बजरंगाची कमाल, मी आलो, मनमोहना तू राजा अशी चित्रपटाची गाणी तुफान हिट झाली. या फोटोत वर्षा उसगावकर यांच्यासोबत दिसत असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? ही अभिनेत्री म्हणजे वैशाली दांडेकर.  

हमाल दे धमालमधील सहनायिका म्हणजेच वर्षा उसगावकर यांच्या बहिणीची भूमिका वैशाली दांडेकर यांनी साकारली होती. या चित्रपटानंतर वैशाली दांडेकर काही मोजक्याच प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. हमाल दे धमाल चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३४ वर्षे होत आहेत. वैशाली दांडेकर मराठी तसेच हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्री आहेत. १९८७ सालच्या ‘अंधा युद्ध’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर दूरदर्शनवरील ‘महानगर’ या मालिकेतून त्यांनी रिमा लागू यांच्यासोबत काम केले. प्रहार, जखमों का हिसाब, कर्ज तेरे खून का अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. पण कालांतराने त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला.

वैशाली दांडेकर यांनी सेंट लुईस हायस्कुलमधून शिक्षण घेतले होते. बी कॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी एलएल एमची पदवी मिळवली. वकिलीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर वैशाली लॉ कॉलेजमध्ये शिकवायला लागली. मनोज गुरव यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर वैशाली यांनी त्यांच्या नावात बदल केला. वैशाली गुरव या नावाने त्यांनी ओळख बनवली. २०१२ साली दादर, मुंबई येथील अॅडव्होकेट बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. गेल्याच वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये वैशाली दांडेकर यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. सध्या आपल्या कुटुंबासोबत पुण्यात त्या स्थायिक आहेत. 

टॅग्स :वर्षा उसगांवकरलक्ष्मीकांत बेर्डे