सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिएलिटी शो इंडियन आयडॉल मराठी (Indian Idol Marathi)च्या मंचावर नुकतीच अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील बरेच किस्से प्रेक्षकांना सांगितले. यावेळी त्यांचा लोकप्रिय डायलॉग 'वक्ख्या विक्खी वुख्खू'मागचा इंटरेस्टिंग किस्सादेखील सांगितला. हा किस्सा आहे 'धुमधडाका' चित्रपटातील. आजही अशोक सराफ यांनी 'धुमधडाका' चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विक्खी वुक्खू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. खरेतर हे शब्द स्क्रिप्टमध्ये नव्हतेच. पण ऐन शूटिंगच्यावेळी हा सीन सुरू असतानाच अशोक सराफ यांना ठसका लागला आणि हा आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली. पण दिग्दर्शक महेश कोठारे यांना त्या ठसक्यातच या चित्रपटाचा यूएसपी सापडला.
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'धुमधडाका' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तो काळ गाजवत असताना ग्रामीण मराठी चित्रपटाला शहरी टच दिला होता. महेश कोठारे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होता. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी या दिग्गज कलाकारांनी यात काम केले होते.